इन्स्टाग्रामवर पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाबाबत स्टेटस ठेवणे दोघा किशोरवयीन मुलांना चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी कुलाबा पोलिसांनी दोघांना अटक केली. मात्र समज देऊन नंतर सोडून देण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, अटक प्रतिबंधात्मक स्वरूपाची होती आणि दोघांना चेतावणी दिल्यानंतर सोडण्यात आले. 14 ऑगस्ट रोजी पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन असतो. यानिमित्ताने पाकच्या स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवाचा स्टेटस या मुलांनी इन्स्टाग्रमावर ठेवला होता. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतले|
एका व्यावसायिकाच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलाब्यातील काही मुलांनी पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवाचा इन्स्टाग्रामवर स्टेटस ठेवला होता. याबाबत एका व्यावसायिकाने कुलाबा पोलिसांशी संपर्क साधून तक्रार दाखल केली. यामुळे जातीय तेढ निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी तात्काळ तरुणांचा शोध सुरु केला. कुलाबा पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने सोमवारी रात्री उशिरा या मुलांचा शोध घेतला. यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात आणले आणि सीआरपीसी 151(3) अंतर्गत प्रतिबंधात्मक अटक केली| पोलिसांनी मुलांचे मोबाईल जप्त करुन तपासले असता, खरोखरच पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहाचा स्टेटस त्यांच्या इन्स्टाग्रामवर दिसला. पोलिसांनी त्यांच्या मोबाईलचा स्क्रीनशॉट काढून त्यांना ताब्यात घेतले. या दोघांची चौकशी केली असता त्यांच्या वागण्यावरून, बोलण्याच्या पद्धतीवरून ते 15 ऑगस्ट रोजी देशातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याच्या उद्देशाने हे करत होते, असे दिसून आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले|
Edited by : Switi Titirmare